गुरुवार, ४ जुलै
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री ९ वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांना डॉ.विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
गेल्या पंधरा दिवसात त्यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ९६ वर्षीय अडवाणी यांना वयाशी संबंधित आरोग्य समस्या आहेत. काही दिवसांपूर्वी अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांना यावर्षीचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि लालकृष्ण अडवाणी यांचे कुटुंबीय या औपचारिक सोहळ्याला उपस्थित होते.



