रविवार, ०४ ऑगस्ट
पाच लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपयांवर तडजोड करणाऱ्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे अखेर निलंबन करण्यात आले आहे.
चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६ वर्ष) असे निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले आहे.
थोरबोले लोणीकंद (पुणे) पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. एका ३२ वर्षीय व्यक्ती विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्ज आला होता. या तक्रार अर्जाचा तपास सहाय्यक निरीक्षक थोरबोले यांच्याकडे सोपविण्यात आला होता. थोरबोले यांनी तपासात त्यांच्या बाजूने अहवाल देण्यासाठी तसेच भविष्यात त्रास न देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती.
दरम्यान, तक्रारदाराने अगोदरच या तक्रार अर्जामुळे नोकरी गेली असताना आणखी पाच लाख रुपयांची लाच मागत असल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची १, ४, ११ आणि २४ जुलै रोजी पडताळणी केली. त्यात थोरबोले यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी गंभीर दखल घेत थोरबोले यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. थोरबोले यांचे वर्तन बेजबाबदार, बेफिकीर, नैतिक अध:पतन आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
थोरबोले यांना मुंबई पोलीस (शिक्षा व अपिले) नियम १९५६ मधील नियम ३ (१-अ) (एक) (ब) च्या तरतुदीनुसार व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील २५ अन्वये तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (निलंबन, बडतर्फी व सेवेमधून काढून टाकणे यांचे काळातील प्रदाने) नियम १९७९ मधील नियमांनुसार कारवाई करीत शासकीय सेवेमधून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. थोरबोले यांना निलंबन कालावधीत दररोज नियंत्रण कक्षामध्ये हजेरी देण्याबाबतदेखील आदेशित करण्यात आले आहे.