महाराष्ट्र संवाद न्यूज निवडणूक विशेष
गुरुवार २१ नोव्हेंबर
बुधवारी राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडले. शनिवारी राज्याची सूत्रे कोणाच्या हाती जाणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान विविध संस्थांच्या एक्झिट पोलचे अंदाज बघता राज्यात सत्ता स्थापनेसाठी मोठा संघर्ष दिसत आहे. सरकार स्थापनेसाठी दावा करण्याकरिता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी असल्याने आणि या दोन दिवसात सत्ता स्थापनेत दिरंगाई झाल्यास राज्यात दबक्या पावलांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्हे आहेत.
अनेक आजी-माजी आमदार, मंत्र्यांकडून तसेच राजकीय विश्लेषकांकडून ही शक्यता वर्तवली जात आहे. असे घडल्यास राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी होणारा अपक्ष आमदार आणि फोडाफोडीच्या खोक्यांचा घोडेबाजार जनतेला बघावा लागणार आहे. त्यामुळे विधानसभेचा मुहूर्त सादर निकालानंतर लगेचच सत्ता स्थापनेच्या विजयाचे तोरण कोण बांधणार याची उत्सुकता आहे. 
राज्यात बुधवारी झालेल्या मतदानानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहे. या एक्झिट पोल मध्ये काहींनी महायुतीच्या तर काहींनी महाविकास आघाडीच्या पारड्यात सत्तेचा कौल टाकला आहे. बंडखोर आणि अपक्षांचा टेकू घेतल्याशिवाय सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे नसल्याने या निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी दिरंगाई होण्याची चिन्ह आहे. आणि ही दिरंगाईच दबक्या पावलांनी राष्ट्रपती राजवटीची चाहूल देत आहे.
शनिवारी विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. मतमोजणीनंतर राज्याची सूत्रे कोणाच्या हाती जाईल याच चित्र स्पष्ट होणार असून महायुती मी महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करते हे समजणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यासाठी जर राज्यात जर-तरची परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत असून तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या वाटाघाटीनंतर नवे सरकार सत्तेवर यायला हवे असे न घडल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल केंद्राकडे करू शकतात. आणि २६ नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

