बुधवार, २७ नोव्हेंबर – मुंबई
मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरूच असून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने ही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. दोन्ही पक्षाचा मुख्यमंत्री पदावरील तिढा आता दिल्ली दरबारी गेला आहे. शिवसेना शिंदे गटाचे समजूत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्या असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहण्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
निरीक्षक आज मुंबईत – दरम्यान भाजपाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत भाजपचे निरीक्षक आज मुंबईत येत असून मुख्यमंत्री पदा संदर्भातील रिपोर्ट ते दिल्लीला देणार आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम राहण्याची चिन्ह आहेत.
अमित शहा मुंबईत – दरम्यान मुख्यमंत्री पदाचा निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री उशिरा मुंबई देण्याची शक्यता आहे. त्यांचा आजचा दौरा जर रद्द झाला तर ते थेट दोन दिवसानंतर येतील तोपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम राहणार असल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आणि काही आमदार अलर्ट वर असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. 
भाजप पदाधिकारी आमदार मुंबईत – दरम्यान अचानक बैठक बोलविले गेले तर पळापळ नको यामुळे महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपाचे आमदार आणि काही प्रमुख पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून असल्याची माहिती समोर येत आहे. तर आवश्यकता पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
शिंदेंचे आमदार घरी – दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार आपापल्या मतदारसंघात परतत असून पुढील निरोप येईपर्यंत त्यांना मतदारसंघात थांबण्याचे आदेश देण्यात आले आहे. 
मुख्यमंत्री पदासाठी शिंदे फडणवीस यांच्यात रस्सीखेच – दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला संमती दर्शविली आहे. पाच अपक्ष आमदारांसह फडणवीस यांना महायुतीतील तब्बल १७८ आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदासाठी शिंदे गटाने ही फिल्डिंग लावली असून शिवसेनेतील नेत्यांना शिंदेचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा आहे. राज्यातील महिलांनी देखील शिंदे यांच्या नावाला पसंती दर्शविल्याने मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता लागली आहे. 
मुख्यमंत्री कोण – दरम्यान महायुतीतील पक्षीय बलाबल बघता भारतीय जनता पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष ठरल्याने दिल्लीतील श्रेष्ठ फडणवीस यांच्या नावाला संमती देऊन त्यांना मुख्यमंत्री बनविण्याची चिन्हे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्णे केंद्रात लावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे केंद्रात जाण्यात इच्छुक नसतील तर त्यांना महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागणार आहे असे देखील विश्वासू गोटातून समोर येत आहे.


