संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी –
राज्य शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर संगमनेरमध्ये दहा ई टॉयलेट व शहरातील जोर्वे नाक्यावर भव्य क्रीडांगण विकसित करण्यासाठी प्रत्येकी एक-एक कोटींचा निधी मंजूर झाल्याने ही कामे सुरू होत असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
आमदार तांबे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात विकासाच्या अनेक योजना सातत्याने राबविल्या गेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून संगमनेरला वैभवशाली संगमनेर शहराची ओळख मिळाली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर स्वच्छतेसाठी नगर परिषदेला विविध पारितोषिक मिळाली आहे.
शहरातील नागरिकांची वर्दळ लक्षात घेता शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची टॉयलेटची व्यवस्था व्हावी यासाठी १० ई टॉयलेटसाठी १ कोटीचा निधी, शहरातील जोर्वे नाका या परिसरात क्रीडांगण विकसित करण्यासाठी १ कोटींचा निधी मिळावा यासाठी ३० जानेवारी २०२४ पासून तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यासाठी फेब्रुवारीमध्ये या निधीसाठी मंजुरी देखील मिळाली.
मात्र नंतरच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता तसेच प्रशासकीय विलंबामुळे हे काम थांबले होते. मात्र आता निधी मंजूर झाला असल्याने लवकरच शहरातील नागरिकांसाठी या निधीच्या माध्यमातून दहा ई टॉयलेट व क्रीडांगणाची निर्मिती केली जाणार आहे. ई टॉयलेटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून त्यात स्मार्ट सेंसर तंत्रज्ञान, टचलेस ऑपरेशन, सोलर लाईट सिस्टीम, पर्यावरण पूरक ऊर्जा वापरण्यासाठी वॉटर रिसायकलिंग युनिटचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय जोर्वे नाका परिसरात भव्य क्रीडांगण निर्माण होणार असल्याने या परिसरातील तरुणांची देखील मोठी सोय या माध्यमातून होणार असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.
नवीन लोकप्रतिनिधींनी संगमनेरकरांची दिशाभूल करू नये…
संगमनेर मध्ये लोकनेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाच्या योजना राबविल्या जात आहे. तसेच आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुरावातील अनेक विकासकामे मार्गी लागत आहे. ई टॉयलेट आणि क्रीडांगण हा त्याचाच भाग असून तांबे यांच्या या प्रस्तावाला तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजीच मंजुरी दिली असल्याने तांत्रिक कारणामुळे अडकलेले काम आता पूर्णत्वास जात आहे. शहरातील अनेक जुन्या कामांच्या विकास निधीसाठी तत्कालीन माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे पाठपुरावा करत आहे. नवीन लोकप्रतिनिधी २३ नोव्हेंबर २०२४ नंतर झाल्याने त्यांनी शहरातील कामांसाठी अर्थसंकल्पामध्ये निधी मिळवावा आणि मगच त्या कामाची जाहिरातबाजी करावी. – सोमेश्वर दिवटे, शहराध्यक्ष.