शिर्डीत मंगळवारी भल्या पहाटे तीन जणांवर जीव गेला हल्ला करण्याचा प्रकार घडला. शिर्डी संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना नियंत्रण कक्षात बोलाविण्यात आले असून त्यांच्या जागेवर राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गलांडे यांनी यापूर्वी शिर्डीत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा शिर्डी पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय गलांडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. शिर्डीत घडलेल्या घटना नंतर साई संस्थान व पोलीस दल सतर्क झाले असल्याचे सांगितले जाते. दरम्यान या घटनेमुळे पोलीस दलात करण्यात आलेले हे बदल महत्वपूर्ण मानले जात आहे.
दरम्यान शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील किरण सदाफुले याला घटनेच्या दिवशीच पकडण्यात आले होते. त्याला न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी दिले आहे. तर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.