शनिवार, दि. १५ फेब्रुवारी – पुणे
हॉटेलचे बिल देण्यावरून मित्राच्या कानाखाली मारल्याचा राग मनात धरून मित्राला अंगावर कंटेनर घालून चिरडल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे.
पुण्यातील वाघोली रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. परमेश्वर बालाजी देवराये (वय ३५ वर्ष) असे अंगावर कंटेनर घालून मारण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. राम दत्ता पुरी (वय २६ वर्ष) असे आरोपी मित्राचे नाव असून पुरी याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या वाघोली येथील कटकेवाडी येथे एका हॉटेलमध्ये परमेश्वर देवराये आणि राम पुरी हे दोघे मित्र जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हॉटेलचे बिल देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे परमेश्वर देवराये याने राम पुरीच्या कानाखाली मारली होती.
कानाखाली मारल्याने संतापलेला राम पुरी याने याने राग मनात धरून हॉटेल बाहेर आल्यावर परमेश्वर देवराये याच्या अंगावर कंटेनर घालून त्याला कंटेनर खाली चिरडून मारले. यात परमेश्वर देवराये याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान आरोपी रामपुरी याला पोलिसांनी अटक केली असून नेमका प्रकार कसा घडला, यामागे अन्य काही कारण होते का याबाबत चौकशी केली जात आहे.
दोन मित्रांमधील किरकोळ बिल देण्याच्या वादाचा परिणाम मित्राचा जीव घेण्यात झाली असून दुसऱ्या मित्राला तुरुंगात जावे लागले आहे. किरकोळ कारणातून झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

