गुरुवार, दि. २० फेब्रुवारी
राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात नासिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर मात्र अवघ्या दोन तासातच न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे मंत्रीपद आणि आमदारकीचे संकट तूर्तास तळले आहे.
मंत्री कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुधीर कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून दिला जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. तर या खटल्यातील दोघांची न्यायालयाने मुक्तता केली.
गुरुवारी न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कोकाटे यांचे मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. निकालानंतर कोकाटे यांनी जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता.
कोकाटे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात तातडीने सुनावणी झाली. या सुनावणी मध्ये कृषिमंत्री कोकाटे यांना न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी तीस दिवसांची मुदत दिली आहे.



