
संगमनेर, दि. २९ मार्च – प्रतिनिधी
राज्यातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी १५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांवरील शास्तीकर पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली. सध्याच्या शास्तीकर धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार तांबे यांनी संगमनेर शहरातील ३९६४ अनधिकृत निवासी मालमत्तांचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “या घरांमध्ये कोणताही व्यावसायिक उपक्रम नाही. तरीही या रहिवाशांवर शास्तीकर लादणे अन्यायकारक आहे. सरकारने त्यांना दिलासा द्यावा आणि शास्तीकर पूर्णपणे माफ करावा.”

सध्या ६०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना शास्तीकर माफ आहे, तर ६०० ते १००० स्क्वेअर फुटांपर्यंत ५०% सवलत देण्यात आली आहे. मात्र, तांबे यांनी ही मर्यादा वाढवून १५०० स्क्वेअर फुटांपर्यंत पूर्ण माफी आणि १५०० ते २००० स्क्वेअर फुटांपर्यंत ५०% माफी देण्याची मागणी केली.
मंत्री उदय सामंत यांनी तांबे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. १५०० स्क्वेअर फुटांपर्यंत शास्तीकर पूर्ण माफ करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.


