
महाराष्ट्र संवाद न्यूज –
अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याच्या रागातून योगेश एकनाथ जाधव (वय २३, रा. कामत शिंगवे, ता. पाथर्डी) या युवकाची त्याच्या घरी जाऊन डोक्यात गोळी घालून हत्या करणाऱ्या आरोपी पोपट गणपत अदमाने (रा. जवखेडे दुमाला, ता. पाथर्डी) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने आरोपीला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
ही धक्कादायक घटना २४ नोव्हेंबर २०१८ रोजी पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथे घडली होती. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने एकूण १७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि फिर्यादी एकनाथ जाधव यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी पोपट अदमाने याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील जी. के. मुसळे यांनी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. निखिल मुसळे यांनी सहकार्य केले. या निकालामुळे पीडित कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

अटकपूर्व जामीन मिळाल्याच्या रागातून युवकाची हत्या, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने एकूण १७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि फिर्यादी एकनाथ जाधव यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

