
महाराष्ट्र संवाद न्यूज –
खंडणी घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या बोगस महिला वकील स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२) हिच्यावर आता फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, तिच्याकडून झालेल्या इतर फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वाढली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथे राहणाऱ्या मंदा सुरेश लांडगे (वय ५४) यांनी स्नेहल कांबळेविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. मंदा लांडगे यांच्या मुलीचे पतीसोबत वाद सुरू असल्यामुळे त्या आपल्या मुलीला माहेरी घेऊन आल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत, स्नेहल कांबळेने स्वतःला वकील असल्याचे भासवले. तिने मंदा लांडगे यांचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन, त्यांची मुलगी व नातवांना न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

याशिवाय, कांबळेने मंदा लांडगे यांना त्यांच्या जावयाकडून गुन्हा दाखल होण्याची भीती दाखवली. तसेच, गुन्हा दाखल झाल्यास व पैसे न दिल्यास कोर्टातून वॉरंट निघेल, पोलीस अटक करतील, अशा धमक्या देऊन तिने २२ जानेवारी ते २१ एप्रिल २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत फिर्यादीकडून १ लाख १३ हजार रुपये उकळले.
लोणी काळभोर पोलिसांनी स्नेहल कांबळेला यापूर्वी शेतकरी कडू सातपुते यांच्याकडून खंडणी स्वीकारताना अटक केली होती. त्यावेळी तिच्याकडे अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी नागरिकांना पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मंदा लांडगे यांनी तक्रार दिल्यानंतर, भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२) (३), ३१८ (४), ३१९(१)(२) नुसार कांबळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहल कांबळेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. तिच्याकडून अजून काही फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


