वटसावित्री पौर्णिमा: संगमनेर तालुक्यात २५२५ वटवृक्षांचे रोपण, महिलांचा पुढाकार
वटसावित्री पौर्णिमेला तालुक्यातील १७१ गावे, २५८ वाड्या आणि विविध वस्त्यांवरील महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात २५२५ वटवृक्षांचे रोपण आणि पूजन केले.
संगमनेर, प्रतिनिधी
माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, दंडकारण्य अभियान समिती आणि अमृत उद्योग समूह यांच्या सहकार्याने हे अभियान एका लोकचळवळीत रूपांतरित झाले आहे. प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली, यावर्षी महिलांनी लावलेल्या या वटवृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक महिलांनीच उचलली आहे.
काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष अर्चना बालोडे भाजपवर टीका करत म्हणाल्या, वटसावित्री हा महिलांच्या जीवनातील महत्त्वाचा सण आहे, मात्र भाजपने याचे राजकारण सुरू केले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भाजपचे काय योगदान? कोणता पदाधिकारी सीमेवर लढण्यासाठी गेला होता? ते यश सैनिकांचे आहे, भाजपचे नाही. भाजपने असे सिंदूरचे नाव घेऊन गलिच्छ राजकारण करू नये.

