संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील कर्जुलेपठार येथे शौचालयासाठी शेतात जाण्यावरून झालेल्या वादामुळे एका महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची तर आणखी एक महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुपाली ज्ञानदेव वाघ (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे, तर त्यांची नणंद मोनिका वाघ या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१० जून) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुपाली वाघ या मुरलीधर पडवळ यांच्या शेतात शौचालयासाठी गेल्या असता, विक्रम पडवळ याने त्यांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर रात्री आठच्या सुमारास रुपाली वाघ, त्यांचे पती ज्ञानदेव वाघ, आणि नणंद मोनिका वाघ हे विक्रम पडवळ यांच्या घरी समजावण्यासाठी गेले होते. त्यावेळी विक्रम पडवळ, मुरलीधर पडवळ आणि अलका पडवळ यांनी त्यांना शिवीगाळ केली. वाघ कुटुंबियांनी माफी मागितल्यानंतरही मुरलीधर पडवळ यांनी जातीय शिवीगाळ केली. संतापलेल्या विक्रम पडवळने घरातून धारदार चाकू आणला. अलका पडवळ हिने रुपाली वाघ यांचे हात धरले आणि विक्रम पडवळने त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकू खुपसला. रुपाली यांना वाचवण्यासाठी धावलेल्या मोनिका वाघ यांच्यावरही विक्रम पडवळने चाकूने वार करून त्यांना जखमी केले.
तत्काळ रुपाली आणि मोनिका यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तिथून त्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान, बुधवारी (११ जून) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रुपाली ज्ञानदेव वाघ यांचा मृत्यू झाला.

अजित दादाभाऊ वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुरलीधर रामकृष्ण पडवळ, विक्रम मुरलीधर पडवळ, आणि अलका विक्रम पडवळ (सर्व रा. कर्जुलेपठार, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना बुधवारी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभे करण्यात आले.
तपासी अधिकारी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते यांनी आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची मागणी मान्य करत आरोपींना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


