
गुरुवार 19 जून –
पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे सिगारेट ओढू नको असे सांगितल्याने एका 24 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
रोहिदास काळुराम काटकर (वय 24, रा. कादवे, ता. वेल्हे, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश उत्तम जोगदंड (वय 21), उमेश ऊर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय 21), पांडुरंग भानुदास सोनवणे (वय 19), आकाश सुभाष भिसे (वय 21), आणि भागवत मुंजाजी आसुरी (वय 20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानशेत येथील नंदाबाई कुंभार मावशीच्या हॉटेलसमोर पाच जणांचे एक टोळके सिगारेट ओढत उभे होते. त्यावेळी रोहिदास काटकर याने त्यांना सिगारेट ओढण्यास मज्जाव केला. यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. संतापलेल्या आरोपींनी रोहिदासला बेदम मारहाण केली आणि त्याच्या छातीत दगड मारला. या हल्ल्यात रोहिदासचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली होती. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी काळ्या रंगाच्या ॲक्टिव्हा आणि स्प्लेंडर या दुचाकींवरून गेल्याचे दिसून आले. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


