
पंढरपूर:
आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, महाराष्ट्र राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वारीदरम्यान कोणत्याही वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्यास, त्यांच्या वारसांना आता 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय, वारीदरम्यान अपंगत्व आल्यास किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी एकादशीसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती. आता या नव्या निर्णयामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

काय आहे नवीन योजनेत?
महसूल विभागाच्या परिपत्रकानुसार, 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत वारीदरम्यान घडणाऱ्या घटनांना ही योजना लागू होईल:
* मृत्यू झाल्यास: अपघाती, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या वारसांना 4 लाख रुपये मिळतील. मात्र, आत्महत्येच्या घटनांमध्ये ही मदत लागू होणार नाही.
* अपंगत्व आल्यास:
* 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास 74 हजार रुपये.
* 60 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये.
* रुग्णालयात दाखल झाल्यास:
* एका आठवड्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल असल्यास 16 हजार रुपये.
* एका आठवड्यापेक्षा कमी काळ दाखल असल्यास 5 हजार 400 रुपये.


