

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
नाशिक: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतचोरी आणि घोटाळे झाल्याचा दावा करत, जर निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भात डिजिटल माहिती सार्वजनिक केली, तर सर्व घोटाळे समोर येतील, असे थोरात म्हणाले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी हे मत व्यक्त केले. त्यांनी राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सादर केलेल्या पुराव्यांचा संदर्भ देत, भाजप लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. निवडणुका चुकीच्या पद्धतीने आणि घोटाळे करून जिंकल्या जात आहेत, असे ते म्हणाले. थोरात यांनी जनतेला लोकशाहीच्या रक्षणासाठी जागृत होण्याचे आवाहनही केले.
माझ्या पराभवाचाही तपास झाला नाही- यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी स्वतःच्या पराभवावरही आश्चर्य व्यक्त केले. माझ्या पराभवाने सर्वांनाच धक्का बसला आहे. खोटे मतदान नोंदवले गेल्याचा आक्षेप मी घेतला होता, पण त्याचा तपासच झाला नाही, असे ते म्हणाले. निवडणूक आयोगाने ४५ दिवसांत सर्व पुरावे नष्ट करण्याचा निर्णय कसा घेतला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याने त्यांच्या या आरोपांमुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.



माझ्या पराभवाचाही तपास झाला नाही-
