
नवी दिल्ली –
देशभरातील फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, आता त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ (Dr.) ही उपाधी लावता येणार आहे. आरोग्य सेवा महानिदेशालयाने (DGHS) या संदर्भात यापूर्वी काढलेला आदेश मागे घेतला आहे. हा निर्णय फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक मोठा विजय मानला जात आहे.
यापूर्वी, ९ सप्टेंबर रोजी डीजीएचएसच्या संचालक डॉ. सुनीता शर्मा यांनी एक पत्र जारी केले होते. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट केले होते की, फिजियोथेरेपिस्ट्स त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी वापरू शकत नाहीत. यामागचे कारण देताना त्यांनी म्हटले होते की, यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि बोगस डॉक्टरांच्या वाढीला चालना मिळू शकते.

‘डॉक्टर’ ही उपाधी फक्त नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आरक्षित आहे. इंडियन मेडिकल डिग्री ॲक्ट, १९१६ नुसार, ज्यांच्याकडे अधिकृत वैद्यकीय पदवी नाही, त्यांनी ‘डॉक्टर’ ही उपाधी वापरल्यास ती अवैध मानली जाते आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.
या आदेशानंतर देशभरातील अनेक फिजियोथेरेपी संघटना आणि फिजियोथेरेपिस्ट्सनी तीव्र आक्षेप नोंदवले. दिल्लीच्या एम्समधील फिजियोथेरेपिस्ट्ससह अनेकांनी या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली. यावर विचार करत डीजीएचएसने केवळ २४ तासांच्या आत आपला आदेश मागे घेतला.
नवीन अधिसूचनेनुसार, डीजीएचएसने म्हटले आहे की, या विषयावर अनेक तक्रारी आणि निवेदने प्राप्त झाली आहेत. या मुद्द्यावर अधिक सखोल विचार आणि चर्चा करण्याची गरज आहे. त्यामुळे, ९ सप्टेंबर रोजी जारी केलेला तो आदेश रद्द करण्यात येत असल्याचे ‘अमर उजाला’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.


