संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे मोठी क्रांती होणार आहे. यामुळे कामाच्या पद्धती आणि नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार असले, तरी नवीन संधींची दारेही उघडणार आहेत. म्हणूनच प्रत्येक तरुणाने या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. एआयच्या युगात जे सातत्याने शिकतील, तेच टिकतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि संशोधक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था आणि ‘डबल डेकर ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरील चर्चासत्रात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, एआय तंत्रज्ञ डॉ. सुयश गुंजाळ, दुर्गाताई तांबे यांच्यासह संस्थेचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गोडबोले पुढे म्हणाले, मेडिकल, इंजिनिअरिंगपासून ते शेतीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर वाढतो आहे. चॅट जीपीटी, जेमिनी यांसारख्या टूल्सनी जग बदलले आहे. भविष्यात विनाचालक गाड्या, गायन-वादन आणि लेखनासारख्या सर्जनशील क्षेत्रातही एआयचा प्रभाव दिसेल. या बदलामुळे जुन्या नोकऱ्या जाण्याची भीती असली, तरी नवीन प्रकारच्या लाखो नोकऱ्या निर्माण होतील. त्यासाठी युवकांनी ‘यंत्राला बुद्धी’ ही संकल्पना समजून घेऊन कौशल्य विकास करण्यावर भर द्यावा.
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी तरुणांना तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी करण्याचे आवाहन केले, तर डॉ. सुयश गुंजाळ यांनी माहिती तंत्रज्ञानातील विविध टूल्सची ओळख करून दिली.
‘डबल डेकर’ उपक्रमाचे कौतुक- राजकारणापलीकडे जाऊन तरुणांच्या करिअरसाठी दर शनिवारी दिग्गजांच्या व्याख्यानांचे आयोजन करणाऱ्या ‘डबल डेकर ग्रुप’च्या संकल्पनेचे अच्युत गोडबोले यांनी विशेष कौतुक केले. असा उपक्रम राबवून तरुणांना जागतिक प्रवाहात आणण्याचे काम संगमनेरमध्ये होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे स्वागत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले, तर प्रास्ताविक बाळासाहेब थोरात यांनी मांडले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी आभार मानले. या चर्चासत्राला अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








