

संगमनेर, प्रतिनिधी-
राजकारण आणि समाजकारणाच्या मैदानात एकमेकांना खंबीरपणे साथ देणारे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने पाहायला मिळाले. निमित्त होते संगमनेरच्या प्रतिष्ठेच्या ‘२६ व्या सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे’. जेव्हा दुर्गाताईंनी हातात चेंडू घेतला आणि समोर डॉ. सुधीर तांबे बॅटिंगसाठी सज्ज झाले, तेव्हा उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले. तांबे दांपत्याची ही खेळाडूवृत्ती पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (१ जानेवारी) आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने २६ व्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते झाला.
स्पर्धेचे उद्घाटन करताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, भारतात क्रिकेट, सिनेमा आणि राजकारण हे आवडीचे विषय आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये युवकांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी हे भव्य व्यासपीठ उभारले आहे. आज या स्पर्धेचा लौकिक देशभर पसरला असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू येथे आपली चमक दाखवण्यासाठी येतात. पुढील १७ दिवस संगमनेरकरांसाठी ही एक मोठी क्रीडा मेजवानीच असणार आहे.
माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी आठवण करून दिली की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी या मैदानासाठी जागा दिली आणि आज आमदार बाळासाहेब थोरात व सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांतून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभे राहिले आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील खेळाडूंना होत असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला.
पहिल्याच सामन्यात चौकार-षटकारांची बरसात- आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांनी या स्पर्धेचे नेटके नियोजन केले आहे. उद्घाटनाचा पहिला सामना मेरी क्रिकेट क्लब नाशिक विरुद्ध सह्याद्री संगमनेर यांच्यात खेळवला गेला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच खेळाडूंनी चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. ढोल-ताशांचा गजर, प्रेक्षकांचा जल्लोष आणि मैदानावरील रोमहर्षक वातावरण यामुळे स्पर्धेची सुरुवात अत्यंत धमाकेदार झाली.
या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, के. के. थोरात, सौरभ कासार, राहुल गडगे, निलेश चव्हाण, सर्वोदय नागरी पतसंस्थेचे पदाधिकारी, राजाभाऊ काजळे, नितीन हासे, अनुप अरगडे, तुषार शिंदे, योगेश भालेराव, शैलेंद्र साबळे, महेश मयूर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आणि ॲड. सुहास आहेर उपस्थित होते.






माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी आठवण करून दिली की,