

संगमनेर, प्रतिनिधी-
“काम केलंय, कमाल करूया” ही केवळ घोषणा नसून शहराच्या सर्वांगीण प्रगतीचे एक प्रबळ व्हिजन आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी यांनी केले. नवनियुक्त नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मालपाणी यांनी शहराच्या विकासासाठी वैयक्तिक जबाबदारीवर भर दिला. ते म्हणाले की, ‘व्हिजन २.०’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे, कारण प्रगती ही केवळ प्रशासकीय निर्णयावर अवलंबून नसून ती लोकसहभागातून निर्माण होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांच्या प्रसिद्ध वाक्याचा संदर्भ देत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, शहराने माझ्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा, मी या शहरासाठी काय करू शकतो, याचा विचार प्रत्येक नागरिकाने नूतन वर्षाच्या निमित्ताने करावा.
संगमनेरची औद्योगिक आणि आर्थिक पायाभरणी आमदार थोरात यांनी अत्यंत भक्कम केली असून, आता सर्वांनी मिळून हा प्रगतीचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. नवनियुक्त नगराध्यक्षांच्या नावाचा ‘मिथिला नगरीच्या जानकी’शी संदर्भ जोडत त्यांनी मैथिली संगमनेरकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून संगमनेर विकासाची नवी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त केला.






