संगमनेर, प्रतिनिधी-
निवडणुकीच्या काळात ‘लाडकी बहीण’ म्हणत मतांची बेगमी करणाऱ्या महायुती सरकारने आता आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली असून संगमनेर तालुक्यातील तब्बल १७,९६७ महिलांना या योजनेतून अपात्र ठरवत डच्चू दिला आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात महायुती सरकारबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, निवडणुकीपुरता बहिणींचा वापर करून आता सरकारने विश्वासघात केला आहे, अशी घणाघाती टीका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चनाताई बालोडे यांनी केली आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील विकसित तालुका असलेल्या संगमनेरमध्ये, जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय नेहमीच अग्रेसर असते. याच भावनेतून यशोधनच्या यंत्रणेने रात्रंदिवस काम करून तालुक्यातील सुमारे ९० हजार महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतले होते आणि डिसेंबर २०२५ पर्यंत या महिलांना लाभही मिळाला. मात्र, आता सरकारने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय हजारो महिलांना योजनेतून बाहेर काढल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे मोठे आश्वासन महायुती सरकारने दिले होते, मात्र ते आश्वासन आता हवेत विरले असून महिलांना मिळणाऱ्या हक्काच्या १५०० रुपयांतही तांत्रिक कारणे दाखवून कपात केली जात आहे.
अनेक गरीब आणि गरजू महिलांच्या नावापुढे पोर्टलवर चक्क ‘सरकारी नोकरी’ असा खोटा शेरा मारण्यात आला आहे, तर अनेक महिलांनी वारंवार केवायसी (KYC) करूनही त्यांना लाभापासून वंचित ठेवले जात आहे. सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही पदरी निराशाच पडत असल्याने हे सरकार केवळ फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
☀️ या संदर्भात वडगाव पान येथील शेतकरी महिला मीना थोरात यांनी सरकारवर प्रहार करताना म्हटले की, निवडणुकीपूर्वी २१०० रुपये देण्याचे गाजर दाखवून आम्हाला फसवण्यात आले. आम्ही शेतकरी असताना आमच्या नावापुढे सरकारी नोकरी असल्याचे दाखवून आमचा हक्क हिरावला जात आहे, हा गरिबांची थट्टा करणारा प्रकार आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी योजना जाहीर करून आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना महिलांना वगळले जात असल्याने, संगमनेर तालुक्यातील महिला आता आक्रमक पवित्र्यात आहेत.






संगमनेर, प्रतिनिधी- 
विशेष म्हणजे,