संगमनेर, प्रतिनिधी-
कृषी क्षेत्र हे अत्यंत व्यापक असून यामध्ये संशोधनासह आर्थिक समृद्धीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन माहितीसाठी ‘कळस कृषी प्रदर्शन’ हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरले असून, अमृतवाहिनीतील या प्रदर्शनाच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचे’ शानदार उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, प्रकल्प प्रमुख सागर वाकचौरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, नऊ वर्षांपूर्वी कळस येथील युवकांनी कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती करण्यासाठी सुरू केलेला हा प्रयोग आज राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून नावारूपास आला आहे. या प्रदर्शनासाठी गेल्या सहा महिन्यांपासून ४० एकर परिसरात मोठी तयारी करण्यात आली असून यामध्ये ६९ पिकांच्या ३५० जातींचे जिवंत प्रात्यक्षिक प्लॉट उभे करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने झेंडू, गहू, हरभरा, मका, सोयाबीन, गुलाब आणि कारले यांसारख्या पिकांचा समावेश असून पाच एकर परिसरात हे लक्षवेधी प्लॉट विकसित केले आहेत. विशेष म्हणजे हॉलंड येथून आणलेले ‘ट्युलिप गार्डन’ हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
कार्यक्रमात बोलताना डॉ. सुधीर तांबे यांनी कृषी प्रदर्शनाची तुलना तीर्थक्षेत्राशी केली. महाराष्ट्रातील भाविकांसाठी जसे पंढरपूर आहे, तसेच शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरेल आणि यातून शेतकऱ्यांची नवीन मानसिकता तयार होईल, असा विश्वास व्यक्त करत कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी कृषी क्षेत्रात मोठी क्रांती केली असून त्यामुळे आज भारत अन्नधान्य क्षेत्रामध्ये सामर्थ्यवान देश झाल्याचे सांगितले.
रणजीतसिंह देशमुख यांनी संगमनेर तालुक्याच्या दूध व्यवसायावर भाष्य करताना सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याला दुधाचा तालुका अशी नवीन ओळख मिळाली आहे. दुग्ध व्यवसायाने येथील ग्रामीण जीवनाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. या प्रदर्शनात राज्यातून व राज्याबाहेरून सुमारे २०० विविध प्रकारच्या संकरित गाई सहभागी झाल्या आहेत, ज्यांचा अभ्यास करणे पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
प्रदर्शनाचे उद्घाटन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. कृषी महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करताना महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाबी रंगाच्या साड्या व फेटे परिधान करून, लेझीम व टाळ-मृदंगाच्या गजरात काढलेली ‘कृषी दिंडी’ सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हवेत फुगे सोडून आणि ढोल-ताशांच्या गजरात या कृषी महोत्सवाचा श्रीगणेश झाला. शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध स्टॉल्ससह हे प्रदर्शन सर्व महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले ठेवण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर आभार सागर वाकचौरे यांनी मानले. याप्रसंगी परिसरातील शेतकरी, महिला, युवक आणि अमृतवाहिनीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमनेरमध्ये ‘कळस’ कृषी प्रदर्शनाचा श्रीगणेशा; ४० एकरात सजली ‘कृषी पंढरी’! कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सज्ज व्हा! बाळासाहेब थोरातांचे कळस कृषी प्रदर्शनातून आवाहन
डॉ. सुधीर तांबे यांनी कृषी प्रदर्शनाची तुलना तीर्थक्षेत्राशी केली. महाराष्ट्रातील भाविकांसाठी जसे पंढरपूर आहे, तसेच शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरेल आणि यातून शेतकऱ्यांची नवीन मानसिकता तयार होईल




कार्यक्रमात बोलताना डॉ. सुधीर तांबे यांनी



