संगमनेर, प्रतिनिधी –
थोर स्वातंत्र्यसेनानी आणि अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, ज्यांना सहकारातील संत मानले जाते, त्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती येत्या सोमवारी, १२ जानेवारी २०२६ रोजी ‘प्रेरणा दिन’ म्हणून संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.
या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील गावोगावी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अमृत उद्योग समूहाच्या वतीने मुख्य अभिवादन कार्यक्रम सकाळी ९ वाजता अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे होणार आहे.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली असून, यावेळी माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात आणि अमृत उद्योग समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि काटकसर या त्रिसूत्रीच्या जोरावर संगमनेर तालुक्यात सहकाराचे जे आदर्श मॉडेल उभे केले, त्या योगदानाचे स्मरण या दिवशी केले जाते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील प्रत्येक गावात प्रभात फेरी, व्याख्याने, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करून हा दिवस साजरा केला जाणार आहे. तसेच, या जयंती महोत्सवाचा भाग म्हणून दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार’ आणि ‘डॉ. अण्णासाहेब स्मृती पुरस्कार’ वितरण सोहळा तसेच भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आगामी काही दिवसांत पार पडणार आहेत.
प्रेरणास्थळ येथील अभिवादन कार्यक्रमास अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी विकास मंडळ व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
संगमनेर तालुक्यात १२ जानेवारीला ‘प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा होणार; सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यासाठी जय्यत तयारी
दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील प्रत्येक गावात प्रभात फेरी, व्याख्याने, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करून हा दिवस साजरा केला जाणार आहे.








