संगमनेर, प्रतिनिधी –
सभागृहात प्रशासनाला प्रश्न विचारणे किंवा राजकीय चर्चा होणे स्वाभाविक असले, तरी सर्वांचे अंतिम ध्येय हे संगमनेरचा विकास हेच असले पाहिजे, राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित असावे आणि सभागृहाच्या आत शिरताना ते उंबरठ्यावरच सोडून केवळ शहराच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि संगमनेर सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर, नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची पहिली विशेष सभा पालिकेच्या ऐतिहासिक रामकृष्ण सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी नवनियुक्त नगरसेवकांना मार्गदर्शन करताना अत्यंत मोलाचा सल्ला दिला.
आमदार तांबे यांनी नगरसेवकांना सुरुवातीलाच संगमनेर नगरपालिकेच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली. १८६० साली स्थापन झालेल्या या नगरपालिकेला १७० वर्षांचा वारसा असून, या सभागृहात आजवर अनेक दिग्गज नेत्यांनी शहराचे नेतृत्व केले आहे. या सभागृहाचे पावित्र्य जपण्याची परंपरा आजही कायम असून, आपण आजही पादत्राणे बाहेर काढून या सभागृहात प्रवेश करतो, हे या ठिकाणच्या नैतिक मूल्यांचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित सदस्यांना जबाबदारीची जाणीव करून देताना आमदार तांबे म्हणाले की, एकदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तो व्यक्ती केवळ एका ठराविक प्रभागाचा किंवा त्याला मतदान करणाऱ्या लोकांचा प्रतिनिधी राहत नाही, तर तो संपूर्ण शहराचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे केवळ आपल्या वॉर्डापुरते मर्यादित न राहता, शहरात कुठेही त्रुटी आढळल्यास त्या तातडीने प्रशासन आणि नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. ‘संगमनेर २.०’ हा जो विकासाचा जाहीरनामा आपण जनतेसमोर ठेवला आहे, त्यातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी गरिबातल्या गरीब आणि शेवटच्या घटकातील नागरिकाला उच्च दर्जाच्या नागरी सुविधा मिळवून देणे हेच आपले मुख्य कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी संगमनेर सेवा समितीच्या सर्वसमावेशक धोरणाचे कौतुक केले. समाजातल्या सर्व जाती-धर्म आणि वर्गातील घटकांना सोबत घेऊन चालण्याची आपली पद्धत असून, झोपडपट्टीतील सामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते आणि प्रस्थापित सामाजिक कार्यकर्ते या सभागृहात एकत्र काम करत आहेत, हेच आपल्या लोकशाहीचे बलस्थान असल्याचे त्यांनी नमूद केले. या विशेष सभेत नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या उपस्थितीत नूर मोहम्मद शेख यांची उपनगराध्यक्षपदी, तर सोमेश्वर दिवटे, रचना मालपाणी आणि जावेद पठाण यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून झालेली निवड ही याच सर्वसमावेशकतेचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी, आमदार सत्यजित तांबे यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली विकासाची ही परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले.
राजकारण सभागृहाच्या उंबरठ्यावर सोडा, विकासासाठी मैदानात उतरा! – आमदार सत्यजित तांबेंचा नगरसेवकांना ‘गुरुमंत्र’
निवडून आल्यानंतर तो व्यक्ती केवळ एका ठराविक प्रभागाचा किंवा त्याला मतदान करणाऱ्या लोकांचा प्रतिनिधी राहत नाही, तर तो संपूर्ण शहराचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे केवळ आपल्या वॉर्डापुरते मर्यादित न राहता, शहरात कुठेही त्रुटी आढळल्यास त्या तातडीने प्रशासन आणि नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत






