
सिन्नर –
नाशिक-पुणे जलदगती रेल्वेचा मूळ आराखडा बदलून तो शिर्डीमार्गे वळवण्याच्या निर्णयामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी आणि रेल्वे कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्गावर एकाच वेळी ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ मार्ग नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–नारायणगाव–चाकण असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) या आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण प्रकल्पाच्या कामात रेल्वेमुळे अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रशासनाने नवीन पर्यायी मार्ग पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा प्रस्तावित केला आहे. या बदलाची माहिती समोर आल्यापासून मूळ मार्गावरील भागात तीव्र अस्वस्थता असून, हा बदल रद्द करून रेल्वे पूर्वीच्याच सरळ मार्गाने नेण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या संदर्भात शेतकरी शिष्टमंडळाने नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन दिले. सिन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या रेल्वे मार्गासाठी यापूर्वीच संपादित करण्यात आल्या असून, काहींना मोबदलाही देण्यात आला आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन विकासाची अपेक्षा असताना अचानक मार्ग बदलणे, हा सिन्नरच्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय असल्याचे कृती समितीने म्हटले आहे. तसेच, या प्रकल्पाच्या मूळ आराखड्यावर शासनाने आतापर्यंत मोठा खर्च केला असल्याने, आता माघार न घेता प्रकल्प मूळ मार्गानेच राबवणे आर्थिकदृष्ट्याही हिताचे असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक आणि पुणे या दोन प्रमुख औद्योगिक शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सक्षम वाहतूक व्यवस्था मिळण्यासाठी आणि विद्यार्थी व नोकरदारांच्या सोयीसाठी हा मार्ग सरळ असणे आवश्यक आहे. जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, तर ३१ जानेवारी रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी व कृती समितीने दिला आहे.




