संगमनेर | प्रतिनिधी
तालुक्यातील वडगाव पान येथील जमीन अतिक्रमण प्रकरणात सक्षम महसूल अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप गणेश रासने यांनी केला आहे. शासकीय मोजणी, पोलीस बंदोबस्त आणि पंचनामे होऊनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे ताबा मिळत नसल्याने, येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सहकार महर्षी क्रीडा संकुल समोर कुटुंबीयांसह उपोषणास बसण्याचा इशारा रासने यांनी दिला आहे.
या संदर्भात प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गणेश रासने यांनी म्हटले आहे की, वडगाव पान येथील स.नं. १३/१ (क्षेत्र ०.६१ आर) ही त्यांची मालकीची मिळकत असून, शासकीय मोजणीत या जमिनीच्या पूर्वेकडील सुमारे १७ आर क्षेत्रावर जनार्दन सहादू गायकवाड व इतरांनी अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले आहे. या अतिक्रमणाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित अतिक्रमण हटवून ताबा देण्याचे आदेश दिले होते.
या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्तही उपलब्ध करून देण्यात आला होता, मात्र तरीही समनापूर येथील मंडळाधिकारी प्रत्यक्ष कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे रासने यांचे म्हणणे आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही तहसीलदार कार्यालयाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतरही आदेशांची अंमलबजावणी का केली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आपला न्याय्य हक्क डावलला जात असून कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन अतिक्रमण हटविण्याची कारवाई न केल्यास, प्रजासत्ताक दिनी आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे रासने यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
वडगाव पान अतिक्रमण प्रकरण: प्रशासकीय दिरंगाईविरोधात गणेश रासने यांचा कुटुंबीयांसह उपोषणाचा इशारा
समनापूर येथील मंडळाधिकारी प्रत्यक्ष कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे रासने यांचे म्हणणे आहे.



संगमनेर | प्रतिनिधी



