संगमनेर | अनंत पांगारकर –
संगमनेर तालुक्यातील सुमारे १० हजार कामगारांसाठी संजीवनी ठरणारा ‘ESIC’ (राज्य विमा प्रतिष्ठान) सेवा दवाखाना मंजूर झाला असून, या निर्णयावरून आता तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ रोजी काढलेल्या या आदेशाचे श्रेय घेण्यासाठी महायुतीचे आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी हा दवाखाना आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केल्याने नक्की कामाचा धनी कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला असून ज्या दिवशी दवाखाना कृतीत येईल तो संगमनेरकरांसाठी सुदिन असेल.
आमदार अमोल खताळ यांनी या यशाचे श्रेय महायुती सरकार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या काळात मालपाणी उद्योग समूहातील कामगारांना आपण रुग्णालय सुरू करण्याबाबत शब्द दिला होता, अशी आठवण खताळ यांनी करून दिली. नागपूर अधिवेशनादरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे या विषयाची तांत्रिक बाजू मांडून पाठपुरावा केला आणि म्हणूनच नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने हे दवाखाने संगमनेरमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश दिले, असा दावा खताळ यांनी केला आहे. कामगारांच्या आरोग्यासाठी हक्काची सोय संगमनेरमध्येच उपलब्ध करून देणे हे माझे कर्तव्य होते, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
दुसरीकडे, आमदार सत्यजित तांबे यांनी हा विजय आपल्या सातत्यपूर्ण तांत्रिक आणि प्रशासकीय पाठपुराव्याचा असल्याचे म्हटले आहे. नागपूर विभागातील ‘महाल’ आणि ‘न्यू सेक्टर’ या भागांत बंद पडलेले दवाखाने संगमनेरमध्ये खेचून आणण्यासाठी आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे लढा दिला होता, असे तांबे यांनी स्पष्ट केले. नागपूरमधील बंद सुविधा संगमनेरमध्ये आणणे हे एक मोठे आव्हान होते, परंतु आमच्या पाठपुराव्यामुळे ४ जून रोजी अधिकृत आदेश निर्गमित झाले, असा दावा तांबे यांनी केला आहे. ‘संगमनेर २.०’ च्या माध्यमातून तालुक्याचा जो सर्वसमावेशक विकास आराखडा आम्ही आखला आहे, त्याचाच हा एक भाग असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
दोन्ही आमदारांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्ट्सचा पाऊस पडत असून, आपापल्या नेत्यांनीच कसे हे रुग्णालय आणले, याचे पुरावे दिले जात आहेत. अमोल खताळ हे सत्ताधारी गटाचे आमदार असल्याने शासनावरील प्रभावाचा मुद्दा मांडत आहेत, तर सत्यजित तांबे हे प्रशासकीय प्रक्रियेतील आपला दांडगा अनुभव आणि पाठपुराव्याचा जोर अधोरेखित करत आहेत.
विशेष म्हणजे, ज्या कामगारांच्या पगारातून ESIC ची रक्कम कापली जाते, त्यांना आता किरकोळ उपचारांसाठी नाशिक किंवा पुणे गाठण्याची गरज उरणार नाही. या सेवा दवाखान्यांमुळे मोफत औषधोपचार, तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला स्थानिक पातळीवरच मिळणार आहे.
मंजुरीचे आदेश एकच (४ जून २०२५), लाभार्थी संख्याही १० हजार आणि विभागही तोच… पण श्रेय घेण्यासाठी दोन मातब्बर नेते समोरासमोर ठाकले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा ‘क्रेडीट वॉर’ सुरू असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. श्रेयाची लढाई कुणीही जिंकली तरी, या निमित्ताने संगमनेरच्या कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला आहे, हे मात्र नक्की. असे असले तरी प्रत्यक्षात हा दवाखाना सुरू होईल तो दिवस मात्र संगमनेरकरांसाठी आनंदाचा असेल.
खताळ की तांबे? ‘श्रेय’वादाचा हायव्होल्टेज ड्रामा!
श्रेयाची लढाई कुणीही जिंकली तरी, या निमित्ताने संगमनेरच्या कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला आहे, हे मात्र नक्की. असे असले तरी प्रत्यक्षात हा दवाखाना सुरू होईल तो दिवस मात्र संगमनेरकरांसाठी आनंदाचा असेल.





दोन्ही आमदारांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्ट्सचा पाऊस पडत असून,

