संगमनेर, प्रतिनिधी –
तालुक्यातील सावरगाव तळ, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि झोळे या गावांना पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. ज्याप्रमाणे तळेगाव निमोण आणि साकुर पठार भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जात आहे, त्याच धर्तीवर या गावांचा प्रश्नही उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून सोडवला जाईल. तुम्हाला पाणी देण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून तो शब्द आम्ही नक्कीच पूर्ण करू, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
सावरगाव तळ येथे आयोजित ५ कोटी ७१ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार खताळ बोलत होते. या कार्यक्रमाला महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नूतन ग्रामपंचायत इमारत, सभामंडप, व्यायामशाळा साहित्य, म्हसोबा महाराज मंदिर रस्ता दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालय परिसर तसेच गावठाणात सोलर हायमास्ट दिवे बसवणे, स्मशानभूमी सुशोभीकरण आणि पिंपळगाव माथा-सावरगाव तळ-चंदनापुरी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण अशा महत्त्वपूर्ण कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार खताळ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत दिलेला पाण्याचा शब्द पाळण्याची संधी आता मिळाली आहे. निळवंडे उजव्या कालव्यावरून उपसा जलसिंचन योजनेद्वारे या भागाला पाणी मिळणार असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. माजी मंत्री स्व. बी. जे. खताळ पाटील यांनी सुरू केलेल्या परंतु मध्यंतरी अपूर्ण राहिलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याला मिळाला आहे. काही लोक सर्व निधी आम्हीच आणल्याचा दावा करत आहेत, मात्र त्यांच्या या टीकेला आपण विकासकामांतूनच उत्तर देत आहोत. जर सर्व निधी त्यांनीच आणला होता, तर गेल्या ४० वर्षांत ही कामे का पूर्ण करता आली नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.



पाणी देण्याची जबाबदारी आमची, ती पूर्णच करू : आमदार अमोल खताळ
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याला मिळाला आहे.

