नाशिक:
नाशिकमध्ये महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत नाशिक जिल्हा न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
खरातची कोठडी संपल्याने रविवारी त्यास न्यायाधीश एम. व्ही. भराडे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासासाठी आणखी वेळ हवा असल्याचे सांगत तीन दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणी केली, ती न्यायालयाने मान्य केली.
न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, आरोपी तपासात सहकार्य करत नाहीये. खरातवर आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आरोपीचा मोबाईल डेटा रिकव्हर करणे, जंगम मालमत्तेचा शोध घेणे आणि जप्त केलेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे समोरासमोर चौकशी करणे अद्याप बाकी आहे.
दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी कोठडी वाढवण्यास विरोध केला. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.
या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी खरातला ७ आणि ५ दिवसांची कोठडी देण्यात आली होती, आता ही मुदत १ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
‘भोंदूबाबा’ अशोक खरातच्या पोलीस कोठडीबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय
यापूर्वी खरातला ७ आणि ५ दिवसांची कोठडी देण्यात आली होती, आता ही मुदत १ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.





