बेकायदेशीर गर्भपात आणि लिंगनिदान प्रकरण: पुणे येथील दोन डॉक्टर अटकेत! आरोपींची संख्या १६ वर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर:
लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण १६ आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये ५ डॉक्टरांचा समावेश आहे. ताज्या अपडेटनुसार, या रॅकेटमध्ये पुणे येथील दोन डॉक्टर आणि एका अन्य व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मशीन्स खरेदीचे मूळ स्त्रोत आणि या रॅकेटमधील अन्य सहभागींचा शोध घेणे सध्या सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या पुणे येथील आरोपींची नावे डॉ. आकाश सुभाष मलगुंडे (शिरूर), डॉ. नीलकंठ अशोक जाधव (लोहगाव) आणि नरेंद्र साहेबराव ठाकरे (केशनांदगाव) अशी आहेत.
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, नेवासा येथील डॉ. भणगे आणि रवींद्र ढगे यांनी लिंगनिदान करण्यासाठी वापरण्यात येणारी विनानोंदणीकृत बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन्स या पुणे येथील आरोपींकडूनच खरेदी केली होती. पोलिसांनी दोन्ही मशीन्स जप्त केली असून, आरोपींना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे रॅकेट अत्यंत संघटितपणे चालवले जात होते. एजंट ८ ते १० महिलांना एकत्रित करून एका अज्ञात स्थळी न्यायचे, जिथे डॉ. भणगे आणि ढगे हे लिंगनिदान करत असत. प्रत्येक चाचणीसाठी डॉक्टरांना १० हजार, तर एजंटांना ३ हजार रुपये मिळायचे.
याव्यतिरिक्त, श्रीरामपूर येथील डॉ. राज अजीज शेख यालाही बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तपासात काही महिलांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यापैकी तिघींचा गर्भपात केल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.






