लिंगनिदान व अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; नाशिकमधून आणखी दोघांना अटक, एकूण ६ डॉक्टरांसह १८ आरोपी गजाआड, ४ सोनोग्राफी मशीन जप्त
पोलीस पथकाने या दोन्ही आरोपींना शुक्रवारी अधिकृतपणे अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


त्यांच्याकडून पोलिसांनी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तीन चारचाकी गाड्या जप्त केल्या होत्या. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान ठेवत पुढे ढगे नामक आरोपीला अटक करून त्याच्याकडूनही दुसरे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त केले. त्यानंतर श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे व डॉक्टर शेख यांना लिंगनिदान आणि अवैध गर्भपात केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी तपासाचा रोख पुणे शहराकडे वळवला आणि तेथून बेकायदेशीर मशीनची विक्री करणाऱ्या दोन डॉक्टरांसह एका व्यक्तीला अटक केली. या आरोपींच्या चौकशीतून वडगाव मावळ येथील मारुती ढोरे याचे नाव समोर आले आणि त्याच्याकडूनही तिसरे अवैध मशीन जप्त करण्यात आले.
पथकाने काल पहाटे निफाड येथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. यामध्ये निफाडच्या सरस्वती नगर येथील डॉ. कुणाल प्रभाकर वल्टे (वय ३३, बीएएमएस, रा. टेकडी कॉलेजसमोर, निफाड, दवाखाना- करंजगाव) आणि नांदूर मधमेश्वर येथील सागर शांताराम उल्हाळ (वय २५) यांचा समावेश आहे. डॉक्टर वल्टे हा मूळ आरोपी डॉक्टर भणगे याचा वर्गमित्र असून, त्याने हे बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुणे येथील ठाकरे नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतले होते, तर सागर उल्हाळ याने डॉक्टर वल्टेचे हे मशीन आपल्या ब्लड टेस्टिंग लॅबमध्ये लपवून ठेवण्यासाठी जागा दिली होती.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे हे अत्यंत बारकाईने करत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी काही मोठ्या डॉक्टरांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
