महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करणे आणि महिलेचा हात धरून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपरणे (ता. संगमनेर) येथे घडली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरणे येथील वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या व मूळच्या कोल्हार येथील रहिवाशी असलेल्या ३५ वर्षीय महिलेने इक्विटास बँकेतून जानेवारी २०२६ मध्ये कर्ज घेतले होते. निलेश सोपान देशमुख (रा. चैतन्य नगर, संगमनेर) याने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी दिवसभरात वारंवार फोन करून कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दबाव टाकला. हप्ता न भरल्यास बघून घेण्याची आणि घरातील सामान उचलून नेण्याची धमकीही त्याने फोनवरून दिली.
त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास, तक्रारदार महिला घरी जेवण बनवत असताना आरोपी निलेश देशमुख हा त्यांच्या खोलीत आला. त्याने कर्जाचे हप्ते भरण्यावरून अश्लील भाषेत शिवीगाळ करत महिलेचा हात धरून तिला जवळ ओढले व तिचा विनयभंग केला.
महिलेने आरडाओरड केल्यानंतर जवळच असलेले भट्टीच्या मालकाने मध्यस्थी करत सोडवासाडव केली. त्यावेळी आरोपीने त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पती घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर महिलेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात निलेश सोपान देशमुख याच्याविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.