महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची सोमवारी प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनी स्वत:ला सावरत कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
८१ वर्षीय पिचड सकाळी सातच्या सुमारात फेरफटका मारत असतांना अचानक त्यांचा रक्तदाब अनियमीत झाल्याने त्यांची प्रकृती खालावली. माजी आमदार वैभव पिचड यांनी तातडीने त्यांची डॉ. मारुती भांडकोळी आणि डॉ. बाबासाहेब गोडगे यांच्याकडून तपासणी करुन घेतली. मात्र त्यांनी पिचड यांना तातडीने लिलावतीत हलविण्याचा सल्ला दिला.
पिचड यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजुर येथील निवासस्थानी धाव घेतली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पिचड यांना लगेचच हलविण्यात आले. रुग्णवाहिकेत बसत असतांना मधुकरराव पिचड यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना हात वर करुन प्रतिसाद दिला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ‘साहेब, लवकर बरे व्हा. काळजी घ्या’ अशी विनवणी केली.

