महाराष्ट्र संवाद न्यूज
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर होऊ घातलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून स्वीकारण्यात न आल्याने लटके यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने तातडीने या संदर्भातील सुनावणी गुरुवारी निश्चित केली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर येत्या 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे त्यासाठी ऋतुजा लटके यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली.
सुरुवातीला लटके यांनी निवडणुकीसाठी पालिकेकडे मुभा मागितली होती मात्र पालिकेने ती नाकारली. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी मुंबई महापालिका प्रशासनाकडे आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. राजीनामा मंजूर करण्यात यावा यासाठी नियमानुसार एक महिन्याचे वेतनही त्यांनी पालिका कोषागारात जमा केले.
तरी देखील त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे पालिकेच्या वेळ काढूपणाविरुद्ध ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
बीएमसीने आपला राजीनामा मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. तसेच 3 ऑक्टोबरला दिलेला सेवेचा राजीनामाही अद्याप स्वीकारला गेला नसल्याने तो तातडीने स्वीकारून नोटीस कालावधी माफ करण्याची मागणी त्यांनी न्यायालयाला केली. गुरुवारी न्या. नितीन जामदार यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने गुरुवारीच यावर उच्च न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे.
शिवसेनेचा प्लॅन ‘बी’ तयार
ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली असली तरी त्यांनी शिंदे गटाकडून लढावे यासाठी त्यांचा राजीनामा मंजूर न करण्याबाबत महापालिका प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे बोलले जाते. शिवसेनेचे सर्वच काही पळविणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांनी आता पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाचा उमेदवारही आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे यदाकदाचित ऋतुजा लटके यांची उमेदवारी राजीनामा मंजूर न झाल्यास दाखल झाली नाही अथवा शिंदे गटाकडून दाखल झाली तर ठाकरे गटाने दुसरा पर्यायी उमेदवार देण्याची तयारी चालविली असल्याचे सांगितले जाते. यासाठी ठाकरे गटाचा प्लॅन बी तयार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लटके याच उमेदवार असतील असा देखील सेनेतील नेत्यांना विश्वास आहे.

