महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राज्यात नवं सरकार सत्तारूढ झाल, त्यावेळी मी तुरुंगात होतो. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. राज्यातल्या सरकार तेच चालवत आहे आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देखील भेटणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या फडणीसांविषयीच्या कौतुकास्पद उद्गाराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची बुधवारी रात्री तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
राऊत म्हणाले, राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. मी त्या निर्णयांचे स्वागत करतो. तुरुंगात असताना मला जेव्हा-जेव्हा वर्तमानपत्र वाचायला मिळायचे तेव्हा तेव्हा मी याबद्दल माहिती घेत होतो. गरिबांना घर देण्याचा निर्णय आणि म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय हे फडणवीस यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत. आमच्या सरकारने म्हाडाचे अधिकार काढून घेतले होते, ही बाब मला फारशी रुचली नव्हती. या सरकारने म्हाडाला पुन्हा अधिकार दिले आहेत.
नव्या मुख्यमंत्र्यांना भेटणार का असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. राज्यातलं सरकार फडणवीस चालवत आहे. त्यांच्या विभागाशी संबंधित माझे विषय असल्याने मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे. राजकीय कटूता संपवली पाहिजे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली त्याचं मी स्वागत करतो. यावेळी आपण ईडी कारवाईबद्दल बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुरुंगातील दिवसाबद्दल राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, तुरुंगामध्ये तुम्हाला भिंतींशी संवाद साधावा लागतो. तुरुंगामध्ये एकाकीपणा खायला उठतो. तुरुंगात राहणं काही सोपं नसतं. तुरुंगात लोक मजेत राहतात, असं वाटत असेल तर तसं नाहीये. तुरुंगात राहणं खूप कठीण आहे. यामुळेच तुरुंगाची संकल्पना अस्तित्वात आली असावी. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी हे दिवस खूप खडतर गेले. ज्यांनी माझ्या अटकेच यंत्र रचलं होतं त्यांना आनंद मिळाला असेल तर मीही त्यांच्या आनंदात सहभागी आहे. तुरुंगात असताना हातात घड्याळ घालता येत नव्हते. आता तीन महिन्यांनी हातात घड्याळ घातले पण ते सैल होत आहे. तीन महिन्याच्या तुरुंगाच्या काळात मला वाटलं, लोक आता मला विसरले असतील, पण लोकांचे प्रेम काल आणि आज बघतोय, असं देखील राऊत म्हणाले.

राज ठाकरेंना लगावला टोला
“राज ठाकरेंनी मला तुरुंगात जावं लागेल आणि एकांतात स्वतःशीच बोलायची प्रॅक्टिस करा असा सल्ला दिला होता”. आज मी सांगतो, होय मी एकांतात संवाद साधला. कारण सावरकरही एकांतात होते, लोकमान्य टिळकही एकांतात होते, स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. माझीही अटक राजकीय होती हे आता न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट झाल आहे असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

