महाराष्ट्र संवाद न्यूज
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बुलढाण्यातील सभेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे यांच्या आरोपाचा समाचार घेतानाच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फ्रिज मधून खोके कोठे गेले… याचा आपण शोध घेणार असल्याचा इशारा ठाकरेंना दिला आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-ठाकरे गटातील वाद थांबावयास तयार नाही. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शिंदे गटातील आमदार आणि खासदारांवर टीका केली होती. “बोक्यांना खोके हवे होते, म्हणून ते भाजपाला मिळाले”, तुम्ही खोके घेतले असतील तर त्यातील थोडे शेतकऱ्यांना देखील द्या, तुम्ही खोके घेतलेत हे मी म्हणत नाही तर तुमच्याच गटाचे आमदार सांगत आहे.
बच्चू कडू यांनी देखील सांगितलं की लग्नाला गेलो तरी लोक आले खोकेवाले असे म्हणतात. याशिवाय भारतीय जनता पक्षावर टीका करताना त्यांनी हा पक्ष आहे की चोर बाजार असे देखील भाजपाला विचारले कारण भाजपामध्ये सगळेच दुसऱ्या पक्षातून घेतलेली लोक आहेत.
ठाकरे यांच्या या विधानाचे पडसाद भाषणानंतर लगेचच काही वेळात उमटले होते. शिंदे गटाचे मंत्री आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना खोके कोणी घेतले हे वेळ आल्यावर सांगू, असा इशारा दिला. तसेच 2024 साली जनता ठरवेल की कोण गद्दार आणि कोणी खोके घेतले, असे देखील ते म्हणाले होते.
दरम्यान आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत फ्रिज मधून खोके कुठे गेले, फ्रिजच्या बॉक्समधून कोठे काय गेले, याचा आपण शोध घेणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल आहे.

