महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसते. शहरातील महिलेला श्री गणेशाला हार व प्रसाद अर्पण करण्याच्या बहाण्याने तिच्याकडील पावणेदोन तोळ्याचे सोने लंपास करण्याचा प्रकार शहराच्या मध्यवस्तीत घडला. शहर पोलिसांनी या संदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास फसवणूक झालेली महिला तिच्या मालकीच्या पान टपरीवर असताना तेथे आलेल्या अज्ञात व्यक्तीने, मावशी मला गायछाप द्या. असे म्हणत जवळ असलेल्या प्लास्टीकच्या पिशवीमधील हार व प्रसाद मला मंदिरातील पुजारी यांना दान करायचा आहे असे सांगत येथे गणपती मंदिर कोठे आहे. अशी विचारणा केली.
त्यावर संबंधित महिलेने गणपती मंदिर विज वितरण कंपनीजवळ असल्याचे त्याला सांगितले. यावर सदर व्यक्तीने त्याच्या खिशातून शंभर रुपयांच्या पाच नोटा काढून मी सोने चांदिचे दुकान टाकले आहे. मला मंदिरात पाचशे रुपयांचे दान करायचे आहे असे सांगितले. दान करायच्या पैशांना सोने लावून दान करायचे असल्याचे सांगितल्याने महिलेने तिच्या गळ्यातील सोन्याची चैन त्याच्या हातात दिली. त्यावर त्याने त्याच्याकडील शंभर रुपयांच्या एका नोटेत तिची चैन गुंडाळली व जवळचे चारशे रुपये असे त्याच्याकडे असणाऱ्या फुलांच्या पिशवीत टाकून पिशवीला गाठ मारुन या महिलेच्या ताब्यात दिले.
तसेच सोबतची पिशवी तुमच्या पान टपरीतील देवापुढे अर्धातास ठेवा व नंतर मंदिरात देऊन टाका, असे या महिलेला सांगितले. त्यामुळे महिलेने त्याच्या हातातून पिशवी घेतली व दुकानातील फोटोपुढे ठेवली. त्यानंतर संबंधित व्यक्ती पान टपरीवरून निघून गेली. महिलेने जरा वेळाने देवापुढे ठेवलेली पिशवी उघडून पाहिली असता पिशवीमध्ये शंभर रुपयांच्या चार नोटा व झेंडूच्या फुलांची माळ व दोन बिस्कीटचे पुडे दिसले. परंतु महिलेची सोन्याची चैन ज्या शंभर रुपयांच्या नोटेत गुंडाळली होती ती दिसली नाही.
त्यामुळे महिलेने संपूर्ण पिशवी पालथी करून शोध घेतला असता तिला त्याची चैन आढळून आली नाही. या अज्ञात व्यक्तीने तिला बोलण्यात गुंतवत हातचलाखी करुन फसवत सोन्याची चैन चोरून नेली आहे. चैन गेल्याचे लक्षात येताच महिलेने मुलगा, सुनेला आणि पान टपरीजवळील लोकांना याची माहिती दिली. संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही.
त्यामुळे महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत १५ ग्रॅम वजनाची चैन व २ ग्रॅम वजनाचे पेंडल अज्ञात व्यक्तीने फसवणूक करून नेले असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

