महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
४ व ५ जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत विविध उद्योजकांची भेट घेतली. या उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी डावोसला जात असल्याने यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.
रोहित पवार यांनी एका ट्विट द्वारे सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन गेले. पण महाराष्ट्रात सगळ्या पायाभूत सुविधा असतानाही गुंतवणूकदारांना भेटून त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायला लावावी, असं आपल्या सरकारला वाटलं नाही? याला म्हणतात ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या डावोस दौऱ्यावरूनही टोला लगावला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन गेले… पण महाराष्ट्रात सगळ्या पायाभूत सुविधा असतानाही गुंतवणूकदारांना भेटून त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायला लावावी, असं आपल्या सरकारला वाटलं नाही.
याला म्हणतात…
'काखेत कळसा आणि गावाला वळसा!'— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 7, 2023
यासाठी आले होते योगी आदित्यनाथ…
उत्तर प्रदेशमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले आहे. या समिटमध्ये उद्योजकांना सहभागी होण्याचे निमंत्रित देण्यासाठी योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, टाटा सन्स, अदानी समूह, गोदरेज, बिर्ला, पिरामल, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा आदी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांनी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली.

