महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : गोवंश जनावरांच्या कत्तलीस बंदी असली तरी संगमनेरात मात्र या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन सुरूच आहे. शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून येथील सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीचे गोवंश जनावराचे मांस ताब्यात घेत नष्ट केले.
संगमनेर शहरातील मोगलपुरा भागातील खाटीक गल्लीमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला असता तेथे पोलिसांना मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे तेथे आढळलेल्या मांसावरून निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे साडेआठशे किलो मांस ताब्यात घेतले आहे.
दरम्यान पोलिसांची छाप्याची कारवाई सुरू असताना सालेम साटम कुरेशी हा कत्तलखाना चालक तेथून पसार होण्यात यशस्वी झाला. शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. त्यानंतर रात्री उशिराने शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सालेम साटम कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत. शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांची छापेमारी सातत्याने सुरू असली तरी कत्तलखाने बंद करण्यास प्रशासनाला अद्यापही यश येताना दिसत नाही.

