महाराष्ट्र संवाद न्यूज
रंगपंचमीचा जल्लोष सुरू असताना अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील दुःखद बातमी समोर आली आहे. घरासमोरील शेततळ्यात बुडून दोघा लहान भावंडाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे ही घटना घडली.
आर्यन बंडोपंत साळुंखे (वय 9 वर्ष) आणि अनिकेत बंडोपंत साळुंखे (वय 8 वर्षे) अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नाव आहेत. या घटनेमुळे रंगपंचमीच्या उत्सवाला दुःखाची किनार लाभली. लोणी व्यंकनाथ ते येळपणे रस्त्यावर बंडोपंत साळुंखे यांचे कुटुंबीय राहावयास आहे. शेतीच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी त्यांनी आठ दिवसापूर्वी घरासमोर शेततळे केले होते.
साळुंखे दांपत्य रविवारी दुपारी दुसऱ्याच्या शेतात कामासाठी गेले होते. रविवारची सुट्टी असल्याने आर्यन आणि अनिकेत ही त्यांची दोन्ही मुले घरीच खेळत होती. खेळता खेळता हे दोघे भाऊ उत्सुकतेपोटी शेततळ्याजवळ गेले आणि तळ्यात पडले. परिसरातील काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तळ्यात उतरून या दोघांना बाहेर काढले.
मात्र तत्पूर्वीच या दोघा भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती आई वडिलांना मिळाल्यानंतर ते धावतच घटनास्थळी आले. पोटच्या दोन लेकरांचा मृतदेह समोर बघून त्यांचे अवसान गळाले आणि त्यांनी जोराचा हंबरडा फोडला.

