संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या (MIDC) झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
निवडणुकीच्या सुरुवातीलाच शेतकरी विकास मंडळाच्या राखीव जागांवरील सहा उमेदवारांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या होत्या. त्यानंतर सर्वसाधारण गटात सात जागांसाठी तिघा अपक्षांसह दहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निकालानंतर १३ पैकी १२ जागांवर शेतकरी विकास मंडळाने निर्विवाद वर्चस्व मिळविले तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला.
एमआयडीसीचे विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब एरंडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाचे पॅनल निवडणुकीला सामोरे गेले. सुरुवातीलाच शेतकरी विकास मंडळाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात शांताराम गेनू सिनारे (सर्वसाधारण कारखानदार सोसायटी प्रतिनिधी), शांताराम भागाजी मेढे (अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी), रूपाली श्रीकांत गग्गड व कोमल विजय उगले (महिला प्रतिनिधी), राहुल दत्तात्रय गडगे (इतर मागासवर्गीय प्रतिनिधी), व शिला विकास वाव्हळ (विशेष मागासवर्ग प्रतिनिधी) यांचा समावेश होता.
तर सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाचे पियुष ओंकारनाथ भंडारी (१०० मते), सोमनाथ रामनाथ पाबळकर (९६ मते), भाऊसाहेब रखमा एरंडे (९३ मते), किसन केशवराव थोरात (८९ मते), नितीन शिवाजी हासे (८८ मते) व गोरक्ष भाऊराव सोनवणे (७९ मते) यांच्यासह अपक्ष उमेदवार अमित रामनाथ सोनवणे (८३ मते) यांचा विजय झाला असून या गटातून शेतकरी विकास मंडळाचे नानासाहेब हरिभाऊ वर्पे (६९ मते), यांच्यासह अपक्ष उमेदवार मच्छिंद्र शरद जगताप (५४ मते) व रोहित राजेश चौधरी (५२ मते) यांचा पराभव झाला.
निवडून आलेल्या उमेदवारांचा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ आदींनी अभिनंदन केले आहे.

