संगमनेर – महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध स्तरावर ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या बक्षीसांसाठी संगमनेर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीची निवड असून त्यांना राज्य सरकारच्यावतीने अडीच कोटीची बक्षिसे प्राप्त होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिली.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवले जाते. माझी वसुंधरा अभियान ३ मध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था व १६ हजार ४१३ ग्रामपंचायती अशा एकूण १६ हजार ८२४ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.
गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संगमनेर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 10 हजार लोकसंख्येवरील ग्रामपंचायत गटात राज्यात द्वितीय पारितोषिक गुंजाळवाडी गावाने पटकावले. यासाठी ग्रामपंचायतीला 1.5 कोटी रुपयाचे, 2.5 ते 5 हजार लोकसंख्या गटात नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पेमगिरी गावाला 50 लाख रुपये, मिळणार आहे. 2.5 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तिगाव या गावाला 50 लाख रुपयांचे असेल.
यावर खर्च करावी लागणार बक्षीसाची रक्कम…
ज्या ग्रामपंचायत, नगरपालिकांना बक्षीस जाहीर झाले आहे त्यांना, मिळणाऱ्या बक्षीसाच्या रकमेतून पुढील कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत. त्यात शहर, गावाचे हरित अच्छादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाय योजनेत जैवविविधतेच्या संवर्धनासह कार्यक्रम हाती घेता येणार आहे. मियावाकी वृक्षारोपण, अमृत वन, स्मृती बने, शहरी बने, फुलपाखरू उद्यान, सार्वजनिक उद्याने, जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल जैवविविधतेच्या संवर्धन. रोपवाटीकांची निर्मिती. जलसंवर्धनाचे उपक्रम रेन वॉटर हारवेस्टिंग व परकोलेशन, नदी, तळे व नाले यांचे पुन:र्जिविकरण, सौंदर्यीकरणाचे उपक्रम, उर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या उपाय योजना, सौरउर्जेवर चालणारे एलईडी चालणारे दिवे. विद्युत वाहनांना प्रोत्साहन म्हणून चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे उपक्रमाची अंमलबजावणी करता येणार आहे.
सर्वांच्या प्रयत्नाचे फलित
अनिल नागणे, गटविकास अधिकारी
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत संगमनेर तालुक्याला सुमारे अडीच कोटीची बक्षीस जाहीर झाली आहेत. तालुक्यातील तीन गावांना ही बक्षिसे मिळाली आहेत. हे सर्व यश पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नाचे फलित आहे. एकाच वेळेस, एकाच तालुक्याला तीन पारितोषिक प्राप्त करणारा संगमनेर तालुका एकमेव तालुका ठरला आहे.