महाराष्ट्र संवाद न्यूज
सिन्नर – भारतीय अर्थव्यवस्था सध्या ज्या वेगाने वाढत आहे. जगात या क्रमवारीत भारताने ब्रिटनला मागे टाकले असून आपला देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचे प्रतिपादन एमएफडी सुनील कडलग यांनी केले.
सिन्नर येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे स्व. सुधाकर पुंजाजी भगत यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवारी (ता.१७) चला अर्थ साक्षर होऊयात या अभियानांतर्गत, ‘नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर कडलग बोलत होते. यावेळी लेखक, अभिनेते प्रा. राजेंद्र उगले व अरुण इंगळे यांच्या ‘माय बापाची कहाणी’ या संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमावेळी आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितिन ठाकरे, संचालक कृष्णाजी भगत आदी उपस्थित होते.
कडलग म्हणाले, भारताची जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या जीडीपी वाढीच्या दराशी तुलना केल्यास भारत घोडदौड करत असल्याचे दिसते. त्यामूळे २०२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची होऊ शकेल. प्रगल्भ व समृद्ध लोकशाही, स्थिर सरकार, लोकसंख्येच्या ६५ टक्के असलेला उपभोक्ता युवक वर्ग हे भारतीय अर्थव्यवस्थेचे मानबिंदू ठरले आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये वाढत्या प्रमाणात एकीकरण होत आहे. त्यामुळे व्यापार आणि गुंतवणुकीसाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत. पायाभूत सुविधांमुळे व्यवसाय वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असल्याने ही शक्यता निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.
गुंतवणूकदारांनी बाजारातील परिस्थितीचा लाभ घेऊन आर्थिक नियोजन करावे. कमी किमतीत टर्म इन्शुरन्स, पुरेसा आरोग्य विमा, वैयक्तिक अपघात विमा, वाहन विमा आणि इक्विटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण कशी करता येऊ शकते, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिर स्वप्नील डुंबरे यांनी केले तर आभार मधुकरराव भगत यांनी मानले.
सिन्नर येथील भगत अँड सन्सचे संचालक सागर व सुरज भगत यांनी वडिलांचे पुण्यस्मरण पारंपारिक रूढी परंपरांना फाटा देत व दुःखाला आवर घालत वडिलांनी दिलेली अर्थ साक्षरतेची शिकवण अंमलात आणत समाजात अर्थ साक्षरता निर्माण व्हावी म्हणून सुनील कडलग यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

