महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर नगर परिषदेतील वादग्रस्त अभियंता राजेंद्र सुतावणे यांनी महिलेशी अरेरावी करत उद्धट वागणूक देण्याचा प्रकार समोर आला आहे. आशा उद्धटखोर अधिकाऱ्यावर कारवाईसाठी तसेच संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील पूल पडण्यासदेखील संबंधित अधिकारीच जबाबदार असून यासंदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तीन माजी नगरसेवकांसह नागरिकांनी साकडे घातले आहे. बदली होऊन देखील संगमनेर नगरपालिकेतील पदभार न सोडणाऱ्या या अधिकाऱ्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका अल्पना तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश थोरात आदींसह नागरिकांनी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. आधीच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या अभियंता सुतावणे यांचे कामकाजातील बरेच पराक्रम या निवेदनाद्वारे समोर आले आहेत.
नेमका काय आहे प्रकार…
साधारणत: वर्षभरापूर्वी म्हाळुंगी नदीपात्रात भूमिगत गटारीचे पाईप टाकण्याचे सुरू असताना या कामाकडे संबंधित अभियंता राजेंद्र सुतावणे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. नदीपात्रातील या कामासाठी सिंचन विभागाच्या परवानगीची आवश्यकता असताना संबंधित ठेकेदाराने या विभागाची अशी कोणतीही परवानगी घेतली नाही. अभियंता सुतावणे यांनी देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
भूमिगत गटारीचे काम करताना म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या पायाचे बांधकाम मोठ्या मशिनरीने तोडल्याने पूल खचल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. अभियंता सुतावणे यांनी या अहवालाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करित संबंधित ठेकेदाराची पाठराखण केली. व आपल्या कामाची जबाबदारी झटकली.
पूल खचल्याने तो वर्षभरापासुन बंद अवस्थेत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. केवळ एका चुकीमुळे खचलेल्या या पुलाच्या नुकसानीसाठी केवळ संबंधित ठेकेदार आणि अभियंता सुतावणे जबाबदार आहेत. सरकारी मालमत्तेचे नुकसान केवळ सुतावणे यांच्या दुर्लक्ष व बेजबाबदारपणामुळे झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
या खचलेल्या पुलाची दुरुस्ती कधी करणार याची विचारणा वारंवार नागरिक करीत आहेत. यासंदर्भात या भागातील माजी नगरसेविका अल्पना तांबे यांच्यासह महिला, नागरिकानी विचारणा केली असता अभियंता सुतावणे यांनी त्यांच्याशी उद्धट वर्तन करत अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे नागरिकांनी आपले प्रश्न अशा उद्धट अधिका-याना विचारावेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अभियंता सुतावणे यांची बदली येवला येथे झाली असून ते संगमनेर नगर परिषदेतील पदभार का सोडत नाहीत. त्यांची बदली रद्द करण्याबाबत कोणी दबाव किंवा शिफारस करत असेल तर संबंधितांवर 19 मे रोजीच्या आदेशानुसार अट क्र. 5 नुसार नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या नियम 23 नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. असे संचालनाचे नियम असताना या आदेशाचे देखील उल्लंघन झाले असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अशी आहे सुतावणे यांची पार्श्वभूमी…
संगमनेरच्या अमरधाम मधील बांधकामा बाबत लोकप्रतिनिधींची फसवणूक करून चुकीची माहिती दिल्याबद्दल सुतावणे यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
श्रीरामपूर नगर परिषदेत कार्यरत असताना भूमिगत गटारीच्या कामात अनियमितता केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल आहे.
संगमनेर शहरातील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल आहे.
संबंधित अभियंता हा गुन्हेगारी व घोटाळ्याची पार्श्वभूमी असलेला असताना देखील त्याला मुख्यमंत्र्यांचे पीए का पाठीशी घालतात? सदर अभियंता मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांच्या पीएमार्फत नगरपालिकेत फोन करून अधिकाऱ्यांवर दबाव आणतात म्हणून त्यांची बदली होऊन देखील ते पदभार सोडत नाही. अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याची संगमनेर शहरातील बांधकाम परवानगी बाबत झालेले गैरव्यवहार तसेच राजकीय व्यक्तिमार्फत हस्तक्षेप करून दबाव आणणे, गैरव्यवहार दडपणे याची कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

