महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – कोणत्याही व्यवसायाच्या माध्यमातून आपले उद्दिष्ट मानव जातीसाठी व्यापक असायला हवे. त्यासाठी अंतर्मनातून आवड असायला हवी. केवळ पैसा हे एकमेव उद्दिष्ट समोर न ठेवता त्यातून समाजहित साधले जायला हवे. पैशांऐवजी जर आपण उद्दिष्टांसाठी व्यवसाय करणार असाल तर त्या क्षेत्रामध्ये आपण व्यापक यश प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व एमएफडी सुनील कडलग यांनी केले.
येथील सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आयोजित संगमनेर व नाशिक गोदावरी चॅप्टर यांच्यावतीने शुक्रवारी (दि.२१ जुलै) सायंकाळी आयोजित ‘गोष्ट अर्थ साक्षरतेची’ या उपक्रमाअंतर्गत कडलग यांनी अर्थ साक्षरता वृद्धीसाठी दिलेल्या योगदानाचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. संदीप गुंजाळ यांनी ही मुलाखत घेतली.
मुलाखत कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संगमनेर चॅप्टरचे चेअरमन डॉ. सागर गोपाळे होते. तर व्यासपिठावर डेप्युटी रीजन हेड सागर हासे, सेक्रेटरी अण्णासाहेब थोरात, खजिनदार अमोल गुंजाळ, गोदावरी चॅप्टरचे चेअरमन अमित भामरे, खजिनदार गणेश नाईक उपस्थित होते.
प्रेरणादायी ठरणाऱ्या या मुलाखतीत कडलग म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्याचे दिव्य स्वप्न पाहिले. करंगळी कापून रक्ताभिषेक करुन स्वराज्याचे रणशिंग फुंकले. त्यांचे उद्दिष्ट स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हते तर अन्याय, अत्याचार व मुघलांच्या जुलूमी राजवटीच्या वरवंट्याखाली होरपणाऱ्या समाजाच्या व माय बहिणीच्या उत्थानासाठी होते. म्हणून ते कार्य यशस्वी झाले. परमेश्वराने छत्रपती शिवरायांची निवडच जणू या दिव्य कामगिरीसाठी केली होती. तशीच आपली निवड परमेश्वराने कशासाठी व कोणत्या व्यवसायासाठी केली आहे याचा शोध प्रत्येकाने घ्यावा व अशा व्यापक उदिष्टसाठी व्यवसाय उभा करावा.
ग्राहकांसाठी जीवन विमा संरक्षण, आरोग्य विमा संरक्षण, म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून जीवनातील अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्माण , भारतीय अर्थव्यवस्था व भविष्यकाळ या गोष्टींवर कडलग यांनी मुलाखती दरम्यान भाष्य केले. इक्विटी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूकदार भविष्यात संपत्ती निर्माण करतील असेही ते म्हणाले.
यावेळी स्वर्गीय माधवराव भिडे यांनी निर्माण केलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या व्यासपीठाच्या सहकार्याने अनेक उद्योजक ऊभे राहीले असल्याचे डेप्युटी रिजन हेड सागर हासे यांनी सांगितले. समाजात आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी सुनील कडलग यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवही हासे यांनी केला.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ यासाठी संगमनेर चॅप्टर कार्यरत राहील असे चेअरमन डॉ. सागर गोपाळे यांनी सांगितले.
जेनेरीकार्ट मेडीसिनचे डायरेक्टर कैवल्य रिसबूड यांनी जेनरिक फार्मा व्यवसायामध्ये ऊपलब्ध असलेल्या संधी सांगितल्या. शिक्षक जादूगार वसंत आहेर यांनी हात चलाखीचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अण्णासाहेब थोरात यांनी केले तर आभार खजिनदार अमोल गुंजाळ यांनी मानले.

