महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – भाजपा हा धर्माच्या नावावर राजकारण करत असून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष त्यांनी फोडला. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून महाराष्ट्रातील जनतेला हा प्रकार मान्य झालेल नाही. राज्यघटना व लोकशाहीवर विश्वास असलेल्या काँग्रेस पक्षाला आगामी काळ चांगला आहे. फक्त राजकारणासाठी मंजूर झालेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली होती. मात्र याबाबत विधानसभेत आवाज उठवल्याने पुन्हा विकास कामे सुरू झाल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या रणखाबवाडी ते कुंभारवाडी वरवंडी व दरेवाडी ते कवठे मलकापूर या रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, माजी जि. प. सदस्य अजय फटांगरे, इंद्रजीत खेमनर, तुकाराम दातीर, पांडुरंग दातीर, माधव दातीर, भाऊसाहेब डोलनर, अण्णासाहेब कुदनर, जयराम ढेरंगे, गणेश सुपेकर, सुदाम सागर, बाबाजी गुळवे, हौशीराम खेमनर, पुष्पाताई गुळवे, राहुल गंभीरे आदींसह पठार भागातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार थोरात यांच्या हस्ते 16 कोटी 8 लाख रुपये निधीच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
थोरात म्हणाले, मविआ सरकारच्या काळामध्ये आपण तालुक्यातील विविध रस्त्यांसह पठार भागातील अनेक रस्ते मंजूर करून घेतले होते. मात्र सरकार बदलले आणि नव्या सरकारने मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली. या स्थगीतीबाबत आपण सातत्याने आवाज उठवल्याने सरकारने आता ही स्थगिती उठवली. आपण कायम विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्याने सत्ताधारी व विरोधातील मंत्रीही आपला सन्मान करतात. त्याला फक्त काही अपवाद आहेत. शासकीय अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना या विकास कामांसाठी येण्याचे बंधन घालने चुकीचे आहे. वाढलेली बेरोजगारी, महागाई यावर जनता नाराज असून मणिपूरमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत वेदनादायी आहे. देशात अस्थिर वातावरण असून आगामी काळा हा काँग्रेसचाच राहणार आहे.
थोरात यांची पारंपारिक पद्धतीने मिरवणूक…
शेतकऱ्यांचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सातत्याने शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे आज पठार भागातील रणखांबवाडी, रणखांब, कवठे मलकापूर, दरेवाडीसह विविध गावांमध्ये आमदार थोरात यांची पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून नागरिक, महिला व युवकांनी स्वागत केले.

